सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. तरी सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. बॅक वॉटरचे पाणी शेती शिवारात व रस्त्यावर आल्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले.
दरम्यान, हतनूर मध्यम प्रकल्पाच्या बॅक वॉटरच्या पाण्याची पातळी वाढल्याने तालुक्यातील ६ गावांतील ८५ पेक्षा जास्त कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
ऐनपूर येथे बाजारपट्ट्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून, ऐनपूर-निंबोल रस्त्यावर पाच फुटापेक्षा अधिक पाण्याची पातळी वाढली असल्याने निंबोल-विटवा गावांशी संपर्क तुटला आहे. ऐनपूर गावात तिन्ही बाजूंनी पाण्याचा वेळा असून, येथील प्राथमिक उर्दू शाळेत पुराचे पाणी शिरले असून, वर्ग-खोल्या पूर्णत: पाण्यात आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तालुक्यातील निंबोल- ऐनपूर दरम्यानच्या रस्त्यावर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. रात्री उशिरा पुराच्या पाण्याची पातळी वाढू शकते. त्यामुळे धोका होऊ शकतो म्हणून ग्रामस्थांनी जीविताची आणि आपल्या पाळीव गुराढोरांची काळजी घ्यावी व सुरक्षितस्थळी जावे, असे आवाहन त्यांनी केले.
हतनूर मध्यम प्रकल्पाच्या बॅक वॉटरच्या पाण्याची पातळी वाढल्याने तालुक्यातील ६ गावांतील ८५ पेक्षा जास्त कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. खिरवड येथील २० व ऐनपूर येथील २५ कुटुंबांना तेथील जिल्हा परिषद शाळेत, निंबोल येथील ४ तर निंभोरासीम येथील १५ कुटुंब नातेवाईकांकडे आणि धुरखेडा येथील ३ कुटुंब जिल्हा परिषद शाळेत हलविण्यात आले आहेत.
रात्री उशिरा विटवा येथील १५ आणि सुलवाडी येथील ६ घरांमध्ये पाणी शिरल्याने ती घरे रिकामी करण्यात येऊन त्यांना गावांतील शाळेत नेण्यात आले. या सर्व कुटुंबांची जेवणाची आणि आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात येत असल्याचे तहसीलदार बी. ए. कापसे यांनी 'सकाळ'ला सांगितले. रात्री उशिरा पुराची पाणीपातळी वाढण्याची भीती असल्याने महसूल आणि पोलिस प्रशासन स्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा