जळगाव : चोपडा येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार लाच घेताना जाळ्यात

गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासह दुचाकी सोडविण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच स्वीकारताना चोपडा येथील ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला.

शिवाजी बाविस्कर (५२) असे लाचखोर सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. तक्रारदार हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जोयदा येथील असून, तक्रारदारांचे चुलत भाऊ व त्याचा मित्र २३ ऑगस्टला रात्री नऊच्या सुमारास लासूर ते सत्रासेन रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना तीन पोलिसांनी अडवून तुमच्याजवळ गांजा आहे, तुम्ही पोलीस ठाण्यात चला, असे सांगितले. नाहीतर तुमच्यावर गांजाची केस करावी लागेल. 
गांजाची केस व दुचाकी सोडवायची असेल, तर आम्हाला प्रत्येकी ७५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदारांच्या नातेवाइकांकडून रात्री तीस हजार रुपये घेतले आणि दुचाकी त्यांनी ठेवून घेतली. जर तुम्हाला दुचाकी सोडवायची असेल तर उर्वरित २० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. २४ ऑगस्टला तक्रारदारांकडे सहाय्यक फौजदार बाविस्कर यांनी गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी व दुचाकी सोडण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी केली. अखेर तडजोडीअंती पंधरा हजार रुपये ठरले. त्यानंतर तक्रारदारांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्याकडे तक्रार केली. त्याअनुषंगाने त्यांनी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने आदींच्या पथक नियुक्त केले. पथकाने २५ ऑगस्ट दुपारी चोपडा येथे सापळा रचत ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार बाविस्कर यांना तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी चोपडा येथील शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार बाविस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments