बेडग गावात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आली आहे.
सांगली : बेडग गावातील स्वागत कमान घटना संवेदनशील, वेदना होणारी आहे. याबाबत संबंधितांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
या घटनेतील जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे मत राष्ट्रीय अनुसूचित जाती (एससी) आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी पत्रकार परिषदेत केले.
दरम्यान, त्यांनी सामाजिक सलोखा कायम ठेवावा, यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. बेडग गावातील स्वागत कमान प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात पारधी यांनी बैठक घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे, महापालिका आयुक्त सुनील पवार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, अतिरीक्त पोलिस अधीक्षक तुषार पाटील, अधीक्षक तुषार पाटील, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर उपस्थित होते.
पारधी म्हणाले, "या प्रकरणीची माहिती प्रसारमाध्यमांसह समाजमाध्यमावर मिळताच याची दखल घेऊन मी तातडीने दुसऱ्याच दिवशी या प्रकरणाच्या चौकशीचा निर्णय घेतला. दोन दिवस जिल्ह्यात याबाबत उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर आंदोलकांची चर्चा झाली आहे. त्यावर तातडीने तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.
आंदोलकाचे नेते महेशकुमार कांबळे यांनाही मी भेटलो. त्यांनीही पोलिसांत एफआरआय दाखल केल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. मी स्वागत कमान जागेची पाहणी केली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उमेश पाटील, सदस्य, ग्रामस्थांशी संवाद साधून सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. इस्लामपूर येथे थेट आंदोलनस्थळी जावून त्यांच्याशी चर्चा केली.
पारधी यांनी बेडग येथील स्वागत कमान घटनेच्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, जिल्हा परिषद, पोलिस विभागाकडून माहिती जाणून घेतली. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या.
अफवा पसरवल्यास कारवाई : जिल्हाधिकारी
बेडग गावातील कमान प्रकरणी समाज माध्यमांवर अफवा पसरविणाऱ्यांवर व समाजात दुही माजविणाऱ्यांवर कडक कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिला आहे. घटनेमुळे गावात कोणताही भेदभाव होऊ नये याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी. सर्वांनी गावाच्या विकासासाठी पुन्हा एकत्र येणे अपेक्षित असून त्यासाठी सर्वांनी आपापसात सुसंवाद ठेवून कृती करावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा