पुरोगामी महाराष्ट्रात चाललंय काय? आंबेडकरांच्या स्वागत कमानीला विरोध; मिरजेच्या दीडशे कुटुंबांनी सोडलं गाव

आंदोलनानंतरही सरपंच, सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्याने समस्त आंबेडकरी समाजाने मुंबईपर्यंत लाँग मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्याच्या निषेधार्थ येथील आंबेडकर अनुयायांनी बेडग ते मुंबई असा 'लॉग मार्च' सुरू केला आहे.

गावातील सुमारे दीडशेहून अधिक कुटुंबीयांनी संसारोपयोगी साहित्यासह गाव सोडले. 

बेडग येथून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या मागणीसह मंत्रालयासमोर ठिय्या मांडणार असल्याचे अनुयायींनी सांगितले. बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान उभारण्यात येत होती. 

ती ग्रामपंचायत प्रशासनाकडून १६ जून रोजी येथील ग्रामपंचायत, पोलिस व महसूल प्रशासनाने अनधिकृत ठरवून पाडण्यात आली होती. याच्या निषेधार्थ मिरजेतील प्रांत कार्यालयासमोर आंबेडकर समुदायाने आंदोलन करीत जोरदार निषेध व्यक्त केला होता. 


गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. आंदोलनानंतरही सरपंच, सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्याने समस्त आंबेडकरी समाजाने मुंबईपर्यंत लाँग मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. 
सध्या मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे थेट आंदोलनानंतरही सरपंच, सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्याने समस्त आंबेडकरी समाजाने मुंबईपर्यंत लाँग मोर्चा (Bedag to Mumbai long march) काढण्याचा निर्णय घेतला. मंत्रालयावर धडक मारून कारवाईची मागणी आणि कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मागणी करण्याचा निर्णय या अनुयायांनी घेतला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार व जिल्हा प्रशासनाकडून बेडगमधील समाज बांधवांना न्याय मिळत नसल्याने बेडगमधील १५० कुटुंबे घराला कुलूप लावून जनावरांसह मुंबईकडे धाव घेतली. पायी चालत जाण्याचा बुधवारी दुसरा दिवस होता. सांगली शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन हा लॉंग मार्च पुढे मार्गस्थ झाला.

कसबे डिग्रज येथील बौद्ध विहारमध्ये आज मुक्काम केला. दरम्यान, या घटनेस अनुसरून जिल्हा परिषदेने सरपंच व ग्रामसेवकांना नोटीस बजावली आहे. परंतु प्रशासनाकडून ठोस भूमिका व कारवाई होत नसल्याने लॉंग मार्च सुरूच राहील, असे कांबळे यांनी सांगितले.

अधिवेशनात प्रश्न उपस्थित

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांनी आज अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. बेडग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान ग्रामपंचायत प्रशासनाकडून अनधिकृत ठरवून पाडण्यात आली आहे. 

या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी बेडग गावातील दीडशे कुटुंबे अधिवेशनाकडे येत आहेत. या प्रकरणी काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहास द्यावी, अशी मागणी वानखेडे यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गुरुवारी उत्तर देण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments