नितेश राणेंच्या विरोधात तृतीयपंथी समाज आक्रमक, गुन्हा दाखल करण्याची मागणी


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'नागपूरला लागलेला कलंक' म्हणत जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर भाजप नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली केली आहे. यावरूनच टीका करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख हिजड्यांचा प्रमुख असा केला आहे .

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे मॉर्फ केलेला फोटो ट्विट करत 'मर्दानगी वर कलंक ! **#च्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा... बायला कुठला!' अशी टीका केली होती. नितेश राणे यांनी केलेल्या टीकेनंतर आता तृतीयपंथीय समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशन समोर तृतीयपंथीय समाजातील काही आंदोलनकर्त्यांनी नितेश राणे यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
तृतीयपंथी हक्क अधिकार संषर्ष समितीच्या राज्य समन्वयक शमीभा पाटील, निकिता मुख्यदल यांनी आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान कालपासून सुरु केलेलं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलीस करत असून राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यास देखील टाळाटाळ करत असल्याचा आरोप शमीभा पाटील यांनी केला आहे. तर पोलिसांनी दडपशाही करून माझ्या आंदोलक भगिनी यांना जर काही झालं तर याला पुणे पोलीस जबाबदार असतील असे शमीभा पाटील म्हणाल्या .
दुसरीकडे, या आंदोलनापूर्वी नितेश राणे जिथं दिसतील तिथं त्यांच्या तोंडाला काळ फासू, असा गंभीर इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आमदार होण्यासाठी तुम्हाला आमचं, आमच्या नातेवाईकांचे मतदान चालते आमचं रक्त पिऊन आमच्याच जेंडरचचा वापर तुम्ही शिवी म्हणून करत आहात, आम्ही भारताचे नागरिक नाहीत का ? असा सवाल या आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तर नितेश राणेंना सोज्वळपणा, बोलण्याची पद्धत शिकायची असेल तर चार दिवस आम्हा हिजड्यांच्या येऊन राहा, असा घणाघात देखील तृतीयपंथीय आंदोलकांनी नितेश राणे यांच्यावर केला आहे.


0/Post a Comment/Comments