अक्षय भालेरावचा खून पूर्वनियोजित कट, आरोपींसह राजकीय नेत्यांचे सीडीआर तपासा: प्रकाश आंबेडकर

नांदेड: बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव याचा खून पूर्वनियोजित राजकीय कट होता. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. मारेकऱ्यांबरोबरच या कटातील मास्टर माईंडपर्यंत पोहोचण्यासाठी आरोपी आणि काँग्रेससह काही राजकीय पक्षांच्या नेत्यांचे सीडीआर तपासावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी रात्री बोंढार हवेली येथे जाऊन मयत अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तद्नंतर ते नांदेड येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारूख अहेमद, जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

ॲड.आंबेडकर म्हणाले, अक्षय भालेराव याच्यावर यापूर्वीदेखील हल्ला झाला होता. त्यावेळी मारेकऱ्यांना पकडले असते तर आज अक्षयचा जीव गेला नसता. मारेकऱ्यांना अभय देण्याचे काम काँग्रेससह काही राजकीय पक्षाची मंडळी करत आहे. अशा वृत्तीच्या पाठीमागे राजकीय मंडळी उभी राहत असेल तर हे दुर्दैव आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाकडे निवेदन करणार आहोत, या प्रकरणात आमदारानी पुढाकार घेतला असेल तर त्यांचे पक्षातून निलंबन करावे.

या प्रकरणात १२० ब प्रमाणे गुन्हा नोंदवून आरोपींना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी ॲड.आंबेडकर यांनी केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आता तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चार्जसीट दाखल करताना नऊ आरोपींची खूनातील भूमिका सविस्तर नोंदवून घ्यावी. साक्षीदारांचे जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवून घ्यावेत. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे. तसेच मयत अक्षयच्या आई, वडील आणि भावंडाच्या इच्छेनूसार समाजकल्याण विभागाने सरकारी वकिलाबरोबर दुसरा एक वकील द्यावा, जेणेकरून त्यांना विश्वासात घेतल्यासारखे होईल, असे ॲड.प्रकाश आंबेडकर म्हणाले. सोशल मिडियाद्वारे पसरविली जाणारी माहिती वस्तुस्थितीला धरून नाही. त्यामुळे खोटी माहिती पसरविणाऱ्याविरोधातही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

0/Post a Comment/Comments