नांदेड : बोंढार हवेली (ता. नांदेड) येथे गुरुवारी
एक) रात्री दलित वस्तीवर दगडफेक करून हल्ला करण्यात आला. आरोपींनी अक्षय भालेराव (वय २३) या तरुणाची हत्या केली. घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी (Nanded Police) नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सात जणांना अटक केली आहे. अक्षय भालेराव याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात, पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बोंढार हवेली गावात गुरुवारी लग्नाची वरात काढण्यात आली होती. वरातीत काहीजण हातात तलवारी व लाठ्या- काठ्या घेऊन नाचत होते. कामाजी तिडके यांच्या दुकानावर आकाश राहुल भालेराव व अक्षय श्रावण भालेराव हे बंधू खरेदी करीत होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास संजय तिडके हा आरडाओरड करून शिवीगाळ करीत होता.
गावात डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक का काढली, असे म्हणून तुम्हाला खत्म करतो, अशी धमकी देत सात ते आठ जणांनी भालेराव बंधूंना मारहाण सुरू केली. संशयितांनी अक्षय भालेराव याचे हात-पाय धरून ठेवले. त्याच्या पोटावर खंजरने सपासप वार केले. त्याची हत्या करण्यात आली.
आकाश भालेराव हा सोडविण्यासाठी गेला असता त्यालाही मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी दलित वस्तीवर जाऊन घरांवर दगडफेक केली. मृताची आई व अन्य नातेवाईक सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. घटनेनंतर अक्षयला तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर गावामध्ये तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती समजताच बोंढार हवेली गावात पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. या प्रकरणी नऊ संशयितांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये तसेच 'अॅट्रॉसिटी'अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा