सीईओंची स्पाॅट व्हिजिट, अधिकाऱ्यांना फुटला घाम ग्रामीण भागात जलजीवन मिशनअंतर्गत विविध कामे सुरू आहे. ही कामे अंदाजपत्रकानुसार होत आहेत की नाही

अमरावती : ग्रामीण भागात जलजीवन मिशनअंतर्गत विविध कामे सुरू आहे. ही कामे अंदाजपत्रकानुसार होत आहेत की नाही, याची तपासणी बुधवार, १४ जून रोजी झेडपी सीईओ अविश्यांत पंडा यांनी ऑन स्पॉट पोहोचून केली आहे.

याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधा व अन्य ठिकाणी अचलपूर तालुक्यात भेटी देऊन प्रत्यक्ष रेकॉर्ड तपासले. यावेळी ज्या ठिकाणी कामात उणिवा दिसल्यात त्यावर सीईओंनी प्रश्नांची सरबत्ती करताच संबंधित अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला होता.

झेडपी सीईओ अविश्यांत पंडा यांनी अचलपूर तालुक्यात विविध गावांना भेटी देऊन विविध कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहापूर येथील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाण्याची टाकी व ट्युबवेल, येणी पांढरी येथील प्रस्तावित पाणी टाकी, गोंडवाघोली व उपातखेडा येथे जेजेएम कामे, पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. शहापूर येथे सुरू असलेले काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत आहे की नाही याची खात्री केली व संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांना विशेष लक्ष देण्याचे निर्देशही दिलेत. याच गावाचा मुख्य रस्त्यापासून जोडणारा रस्ता कच्चा असल्यामुळे हा रस्ता मिनी म्हाडा (टीएसपी) योजनेमधून या कामाचा प्रस्ताव बीडीओंनी सादर करण्याची सूचना केली.

येणी पांढरी येथील शाळेच्या आवारात पाण्याची टाकी बांधकामास असलेला विरोध पाहता काम बंद आहे. त्याअनुषंगाने संबंधितांना तोडगा काढण्यासंदर्भात आवश्यक सूचना केली. पथ्रोट येथील आरोग्य केंद्रात कर्मचारी उपस्थिती, बाह्य रुग्ण तपासणी स्थिती, स्वच्छता, औषधसाठा आदींबाबत विस्तृत आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश डीएचओ डाॅ. सुभाष ढोले यांनी निर्देश दिलेत. औषधसाठा कमी पडणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना केली. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख, पाणी व स्वच्छता मिशनचे डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी, सहायक बीडीओ भोजराज पवार, अचलपूरचे बीडीओ सुधीर अरबट उपस्थित होते.

महिना भरात सुविधा द्या

रासेगाव येथे नावीन्यपूर्ण उपक्रमामधून गोबरधन प्रकल्पाचे काम सुरू आहे. या ठिकाणी पाणीपुरवठा व विद्युत व्यवस्था करून व लाभार्थ्यांना नळ कनेक्शन देऊन महिनाभरात या सुविधा पुरविण्याची ताकीद संंबंधित अधिकाऱ्यांनी सीईओ पंडा यांनी दिली. या विषयाकडे बीडीओंनी स्वत: लक्ष ठेवण्याची सूचना यावेळी केली.

0/Post a Comment/Comments