वाळू उपसा केल्यास वाहनमालकाची मालमत्ताच होणार जप्त जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले असून अवैध वाळूचे वाहन जप्त केल्यावर दंड न भरल्यास संबंधित वाहनमालकाची मालमत्ताच जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे , अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली . रावेर येथील मोहन बोरसे नामक वाहन मालकाला अशाच आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे . त्याने दंड न भरल्याने त्याच्या मालमत्तांवर बोजे बसविण्याची कार्यवाही केली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले . रावेर येथील कारवाई यशस्वी झाल्यास जिल्हाभरात याच निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले .
काही दिवसांपासून वाळूच्या अवैध वाहतूकप्रकरणी महसूलच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे . या कारवाईत वाहन जप्त केले जाते . मात्र , या वाहनांना आकारण्यात येणार दंड भरला जात नाही . त्यामुळे अशी वाहने जप्तीच्या ठिकाणी पडून राहतात ; पण दंड वसूल होत नाही . आता त्यावरही प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे . वाळूचे वाहन जप्त केल्यानंतर दंड न भरल्यास संबंधित वाहनमालकाला मालमत्ता जप्तीची नोटीस दिली जाईल . या नोटिस नंतरही त्याने दंड भरला नाही तर त्याच्या मालमत्तेवर बोजे बसवून ती शासनजमा केली जाईल , असे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले .
टिप्पणी पोस्ट करा