जळगाव : वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पेटवले; रिक्षाला धडक दिल्याने ग्रामस्थ संतापले

जळगाव:जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीने कळस गाठला आहे. मोठ्या प्रमाणावर वाळूचे चोरटी वाहतूक केली जात असल्याचे चित्र जिल्ह्यात सुरू आहे.

त्यातच वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने लग्नात आलेल्या प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील आव्हाने गावात आज (दि.९) घडला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुपारी अडीचच्या सुमारास राहुल बारेला (रा. आव्हाणे ता. जि.जळगाव) याच्या मालकीचे दोन ट्रॅक्टर वाळू भरून गावातील बसस्थानक परिसरातून जात होते. यावेळी पुढे जात असलेल्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने जळगाव शहरातून आव्हाणे गावात येत असलेली प्रवाशी रिक्षाला (एम.एच.१९,१४१३) जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा चालकासह तीन प्रवासी महिला गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर दोन्ही ट्रॅक्टर चालकांना जागेवर ट्रॅक्टर सोडून घटनास्थळाहून पसार झाले.

पोलिसांची घटनास्थळी धाव…

अपघातानंतर आव्हाणे गावातील संतप्त ग्रामस्थांनी उभे असलेले दोन्ही ट्रॅक्टर पेटवून दिले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

0/Post a Comment/Comments