या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या असहकार आंदोलनात गेल्या महिनाभरापासून जिल्हयात ग्रामपंचायतस्तरावरील 'रोहयो' ची कामे अडकली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायती आणि विविध शासकीय यंत्रणांमार्फत कामे केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायतींच्या स्तरावरील मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येतात.
कामांची अंमलबजावणी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेमार्फत केली जाते; परंतु पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी (नरेगा) आदींसह महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांनी गेल्या १० एप्रिलपासून 'रोहयो'च्या कामांवर बहिष्कार टाकत असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये 'रोहयो ' कामांच्या मजुरी मस्टरवर स्वाक्षरीसह नवीन कामांना मंजुरी देण्याची प्रक्रिया ठप्प असल्याने, संबंधित अधिकाऱ्यांच्या असहकार आंदोलनात गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावरील 'रोहयो' ची विविध कामे अडकली आहेत. महिनाभराचा कालावधी उलटून जात असला तरी, जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींच्या स्तरावरील 'रोहयो'ची कामे ठप्पच असल्याचे वास्तव आहे.
तालुकानिहाय अशी आहे ग्रामपंचायतींची संख्या
तालुका ग्रा.पं.
अकोला ९७
अकोट ८५
बाळापूर ६६
बार्शीटाकळी ८२
मूर्तिजापूर ८६
पातूर ५७
तेल्हारा ६२
घरकुल, पाणंद रस्त्यांसह विविध कामे ठप्प
जिल्ह्यात गेल्या ११ एप्रिलपासून ग्रामपंचायत स्तरावरील रोहयोची कामे ठप्प आहेत. त्यामध्ये घरकुल, मातोश्री शेतपाणंद रस्ते कामांसह सिंचन विहीर, विहिरींचे पुनर्भरण, शोषखड्डे, वृक्षसंगोपन, गुरांचे गोठे, चंदन लागवड, शेळी व कुक्कुटपालन शेड आदी कामे ठप्प आहेत.
यंत्रणांची केवळ ५६ कामे सुरू
रोहयोंतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावरील विविध कामे ठप्प असून, शासनाच्या विविध यंत्रणांची केवळ ५६ कामे सुरू असून, त्यावर ६४२ मजूर काम करत असल्याचे चित्र आहे.
काम कसे करणार?
पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचा रोहयो कामांवर बहिष्कार असल्याने, कामांच्या मजुरी मस्टरला मंजुरी मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर रोहयो कामांवरील मजुरांना मजुरी मिळत नाही. त्यामुळे 'रोहयो' चे काम कसे करणार, याबाबत मजुरांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा