धक्कादायक! रेल्वेमधून मुलांची तस्करी. तब्बल ५९ अल्पवयीन मुलांची सुटका. असे झाले उघड

भुसावळ आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ५९ अल्पवयीन मुलांची आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने सुटका केली आहे. बिहारमधून महाराष्ट्रातील मदरशात जाणाऱ्या २९ अल्पवयीन मुलांना भुसावळ रेल्वेस्थानकावर तर मनमाड येथे ३० मुलांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी पाच संशयित ताब्यात घेण्यात आल्याचे कळते. तर भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव मोहम्मद अंजुर आलम मोहम्मद सैय्यद (पेठभाग वालवा मस्जीद, आस्ठा मस्जीद आस्ठा जि. सांगली) असे आहे.

रेल्वे बोर्डाकडून आलेल्या संदेशावरून सुरक्षा दल - लोहमार्ग पोलिसांनी बिहारमधून महाराष्ट्रातील मदरशात जाणाऱ्या २९ अल्पवयीन मुलांना दानापूर-पुणे एक्स्प्रेसने पुण्यासाठी निघालेल्या या ८ ते १५ वयोगटातील मुलांना भुसावळ रेल्वेस्थानकात मंगळवारी दुपारी उतरवण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मुलांनी मिरजमधील मदरशात नेत असल्याचे पोलिसांना सांगितले. मुलांसोबत पोलिस निरीक्षक विजय घेरडे, निरीक्षक मीणा यांनी संवाद साधला.

दरम्यान, या प्रकरणी एकाविरुद्ध आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मनमाडला देखील अशाच पद्धतीने काही ३० मुलांची सोडवणूक करण्यात आल्याचीही माहिती समोर येतेय. दानापूर-पुणे एक्स्प्रेसने पुण्यासाठी निघालेल्या ८ ते १५ वयोगटातील मुलांना मदरशात की अन्य कुठे घेऊन जाण्यात येत होते?, याची सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी सुरू असल्याचे कळते. त्यानुसार मुले कुठून आली, कुठे जात आहेत याची माहिती संकलित करून अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार आहे.

मंगळवारी दुपारी ही गाडी भुसावळ जंक्शनवर येण्यापूर्वी रेल्वे बोर्डाकडून भुसावळ सुरक्षा रक्षक दलास संदेश आला. त्यानुसार आरपीएफ आर. के. मीणा, लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भाऊसाहेब मगरे व पोलिस पथकाने दुपारी ३.३० वाजता २९ मुलांना गाडीतून खाली उतरवले. दरम्यान, गाडीतून उतरवलेली मुले सकाळपासून उपाशी होती, त्यामुळे आरपीएफ, जीआरपी पोलिसांनी सर्व मुलांना जेवण दिले. नंतर त्यांची चौकशी करण्यात आली. तर रेल्वेत आणखी काही अशाच पद्धतीने मुलं तर नाही ना ?, याच्या चौकशीसाठी एक पथक रेल्वेत बसवण्यात आले. धक्कादायक म्हणजे मनमाड येथे तब्बल ३० मुलांसह चार संशयित ताब्यात घेण्यात आले.

वेगवेगळ्या डब्यांमधून एका तस्करासह ८ ते १५ वर्षे वयोगटातील २९ मुलांना ताब्यात घेतले !
भुसावळ रेल्वे गाडी आल्यावर रेल्वे पोलिसांनी तपासणी केली आणि वेगवेगळ्या डब्यांमधून एका तस्करासह ८ ते १५ वर्षे वयोगटातील २९ मुलांना ताब्यात घेतले. मनमाडपर्यंत केलेल्या पुढील तपासादरम्यान आणखी ३० मुले आणि ४ तस्करांची ओळख पटली आणि त्यांना मनमाड स्टेशनवर ताब्यात घेण्यात आले. चौकशीत मदरशाच्या नावाखाली पूर्णिया जिल्ह्यातून सांगलीत तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्याचे कळते.

वैद्यकीय तपासणीनंतर सुटका करण्यात आलेल्या २९ मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत बालगृह (जळगाव) येथे सुटका करण्यात आलेली मुले सुपूर्द करण्यात आली. तर मनमाड येथे सुटका करण्यात आलेली मुले चाइल्ड हेल्प डेस्क एनजीओ/नाशिक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी आयपीसी ३७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिसांनी भुसावळ स्थानकावर संशयित आरोपी मोहम्मद अंजुर आलम मोहम्मद सैय्यद याची चौकशी करून संबंधित मुलांचे आणि त्याच्या स्वतः च्या ओळखीची कागदपत्र मागितली असता तो देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. तर मनमाड येथून समोर आलेल्या माहिती नुसार संशयित पाचही जण शिक्षक असून हे सर्व विद्यार्थी आहेत. तसेच एका सह प्रवाशाने ट्वीट केल्यानंतर सर्व संशय निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. परंतू अंतिम सत्य पोलीस चौकशीतूनच समोर येणार आहे.

0/Post a Comment/Comments