विहिरीची नोंद करण्यासाठी लाच घेणारा मंडळ अधिकारी गजाआड!

सातबारा उताऱ्यावर विहिरीची नोंद कमी करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील मंडळ अधिकारी ए. सी. गुजर याला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने मुद्देमालासकट गजाआड केले.

नाशिक (Nashik) लाचलुचपत विभागाकडून (ACB) गेले काही दिवस विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. धुळे  ( Dhule) येथील मंडल अधिकारी गुजर यांसह त्याच्या राहत्या घरी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

वकवाड (ता. शिरपूर) शिवारात वडिलोपार्जित शेती असलेल्या शेतकऱ्याकडून लाच घेतांना गुजर याला पकडण्यात आले. शेतकऱ्याच्या शेतात विहीर असल्याची चुकीने नोंद करण्यात आली होती. त्यामुळे संबंधिताला विहिरीसाठी शासकीय अनुदान मागणीचा अर्ज करता येत नव्हता. त्याने पाठपुरावा केल्यानंतर वकवाड येथील तलाठ्याने पाच महिन्यांपूर्वी फेरफार नोंद केली. मात्र मंडळ अधिकाऱ्याच्या सहीशिवाय विहिरीची नोंद कमी करता येणार नव्हती.

त्यामुळे त्याने मंडळ अधिकारी अशोक चिंधू गुजर याला भेटून नोंद कमी करण्याची विनंती केली. त्याच्या शेतजमिनीसंदर्भात पूर्वी केलेले हक्कसोडीचे काम व विहिरीसंदर्भात फेरफार नोंदीची मंजुरी अशा मोबदल्यात गुजर याने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती दहा हजार रुपयात व्यवहार निश्चित झाला. शेतकऱ्याने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची खात्री झाल्यानंतर पथकाने सापळा रचून निवासस्थानी लाच घेतांना गुजर याला अटक केली. गुजर वरिष्ठ मंडळ अधिकारी असून त्याच्या निवृत्तीला अवघी दोन वर्षे शिल्लक आहेत.

येथील पोलिस ठाण्यात गुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भूषण खलाणेकर, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रोहिणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कामगिरी बजावली.

0/Post a Comment/Comments