जळगाव जिल्ह्यात २६ लाख ५२ हजारांचा पानमसाला, तंबाखू जप्त

जळगाव : राज्यात बंदी असलेल्या पानमसाला, सुगंधीत तंबाखू यांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. यामध्ये २६ लाख ५२ हजार ५२० रुपयांचा गुटखा व नऊ लाख रुपयांची दोन वाहने, असा एकूण ३५ लाख ५२ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकीविरुदध अन्न व औषध प्रशासन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने गुरुवारी संध्याकाळी मुक्ताईनगर ते बर्‍हाणपूर रस्त्यावर पूर्णा नदीच्या काठावर सापळा रचला होता. त्यावेळी प्रतिबंधीत अन्न पदार्थाची चोरटी वाहतूक होत असल्याच्या संशयावरुन वाहन क्रमांक एमएच २०, ईएल ५८४९ व एमएच २०, ईएल १७३७ या वाहनांना पथकाने थांबविले. त्याची पाहणी केली असता त्यामध्ये राज्यात उत्पादन, साठा वितरण, विक्री व वाहतुकीकरीता बंदी असलेला पानमसाला व सुगंधीत तंबाखू यांचा साठा आढळून आला. ही वाहने मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आणून मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी वाहन चालक, क्लिनर, वाहन मालक व साठा मालक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी राम भरकड यांनी केली. मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.

0/Post a Comment/Comments