अट्रावल येथे महापुरुषांच्या पुतळ्या ची विटंबना ; गावात तणाव

यावल तालुक्यातील अट्रावल येथे महापुरुषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना झाल्यानंतर तणावाचे वातावरण निर्मित झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील मोठे व महत्त्वाचे गाव मानल्या जाणाऱ्या अट्रावल या गावात आज  पहाटे महापुरुषांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सुमारे दहा-बारा जणांच्या जमावाने पहाटे सव्वा सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार केला. त्यांनी पहिल्यांदा येथील पथदिवा फोडून नंतर पुतळ्याची तोडफोड केली. हा आवाज ऐकून  परिसरातील ग्रामस्थांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या जमावाने या ग्रामस्थांना मारहाण करत पलायन केले.

काही मिनिटांमध्ये च ही वार्ता परिसरात पसरताच दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुफान हाणामारी झाली. यांची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला. त्याप्रसंगी पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. तथापि, अतिरिक्त कुमक मागविण्यात आल्याने लवकरच वातावरण नियंत्रणात आले.

अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी ,पोलीस निरीक्षक राकेश मानेगावकर ,आणि त्यांचे सहकारी अट्रावल  मध्ये ठाम मांडून बसले असून दोन्ही गटांशी सूसंवाद साधत आहेत कोणताही अनुसूचित प्रकार होऊ नये म्हणून रॅपिड ॲक्शन फोर्स सह अतिरिक्त कुमक मागविण्यात आली असून गावात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

पोलीस प्रशासनाने यासंदर्भात येथे वातावरण नियंत्रणात असल्याचे सांगून कोणीही या प्रकरणाच्या बाबत अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे. आज अट्रावल मध्ये जो प्रकार घडला त्यातील दोषींवर कारवाई करण्यात येत असून याबाबत कोणी शोशल मीडियात दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करू नये असेही पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments