शिरपूर (जि. धुळे) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर गुटख्याची तस्करी करणारा ट्रक सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतला. २ एप्रिलला दुपारी हाडाखेड (ता. शिरपूर) येथे ही कारवाई करण्यात आली.
बारा लाख रुपये किमतीचा गुटखा व ट्रक असा एकूण २२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयित चालकाला अटक करण्यात आली.
सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट यांना गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून उपनिरीक्षक संदीप पाटील व सहकाऱ्यांनी हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू केली.
दुपारी संशयावरून पोलिसांनी मध्य प्रदेशातून धुळ्याकडे जाणाऱ्या आयशर कंपनीच्या सहाचाकी ट्रक (एचआर ५५, एएल ०५२६)ला थांबविले. ट्रकमधील मालाबाबत चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन सांगवी पोलिस ठाण्यात नेला.
तेथे झडती घेतल्यानंतर महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेल्या गुटख्याची खोकी आढळली. त्याबाबत धुळे येथील अन्न व औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना सूचित करण्यात आले. विभागाचे अधिकारी के. एच. बाविस्कर यांनी सोमवारी (ता. ३) सांगवी पोलिस ठाण्यात जाऊन जप्त मुद्देमालाची तपासणी केली.
त्यात गुटख्याची तब्बल ४० खोकी, प्रत्येक खोक्यात सहा बॅगा, प्रत्येक बॅगेत पाच किलो गुटखा असल्याचे आढळले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक सुशीलकुमार अयोध्याप्रसाद (वय २४, रा. दिल्ली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त गुटख्याची किंमत १२ लाख, तर ट्रकची किंमत १० लाख रुपये आहे.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर आयुक्त किशोर काळे, प्रभारी पोलिस उपअधीक्षक अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलिस संदीप ठाकरे, संतोष पाटील, हवालदार योगेश मोरे, रणजित वळवी, मनोज पाटील यांनी ही कारवाई केली.
टिप्पणी पोस्ट करा