लाचखोर तलाठीसह कोतवालास पोलीस कोठडी !

जळगाव: चाळीसगाव शेतकऱ्यांची शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी पाच हजाराची लाच घेणाऱ्या तलाठीसह कोतवालास लाचलुचपत विभागाने अटक केली होती. अटकेतील दोन्ही संशयितांना जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील एका शेतकऱ्याच्या नावावर वडीलोपार्जीत शेती आहे. त्यांच्या नावावर असलेले एक शेत पत्नीच्या नावावर करण्यासाठी त्यांनी बोरखेडा येथील तलाठी यांच्याकडे प्रकरण टाकलेले होते. दरम्यान, शेतजमीन पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर सुर्यभान काळे (वय-५०) रा.बोरखडो ता.चाळीसगाव याने ७ हजाराची मागणी केली होती. तडजोडी अंती ५ हजार रूपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार दिली. तक्रारीची पडताळणीसाठी विभागाने सापळा रचला. तलाठी ज्ञानेश्वर कोळी यांनी कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण, वय-३७ रा.श्रीकृष्ण नगर,चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगाव यांच्या मार्फत ५ हजाराची रक्कम स्विकारतांना गुरूवारी २२ मार्च रोजी लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता दोनही संशयित आरोपींना जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

0/Post a Comment/Comments