सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या / शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेवु शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी, १२ वी तसेच इयत्ता १० व १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरांवरील महाविद्यालयात व शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुलामुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणीक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे.
सन २०२२-२३ या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ मार्च, २०२३ आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत. असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी केले आहे.
पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.
जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी अनुज्ञेय रक्कम - भोजन भत्ता - २५०००/-, निवास भत्ता-१२०००/-, निर्वाह भत्ता- ६०००/- असे एकुण-४३०००/-, आहे. या रक्कमेव्यतिरीक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यासाठी प्रतिवर्षी रुपये ५०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रुपये २०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल.
या योजनेचे निकष
विद्यार्थी हा अनु. जाती व नवबौद्ध घटकांतील असावा. विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजेच जळगाव महानगर पालिका हद्दीपासुन ५ कि.मी. परीसरातील महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा. विद्यार्थाच्या पालकांचे वार्षीक उत्पन्न रु.२.५० लाखांपेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याला इयत्ता १० वी, ११ वी व १२ वी करीता प्रतिवर्षी किमान ५० टक्के गुण (अनु. जाती व नवबौद्ध घटकातील दिव्यांगाकरीता ४० टक्के) घेऊन उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.
अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगांव, मायादेवी मंदिरा समोर, महाबळ रोड, जळगांव येथे उपलब्ध होईल. स्वाधार योजने अंतर्गत लाभासाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परिपुर्ण अर्ज भरून सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ, जळगांव येथे दिनांक १५ मार्च २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे. असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा