अकलूद येथील तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू : संतप्त जमावाचा रास्ता रोको

भुसावळपासून जवळच असलेल्या अकलूद येथील शुभम अशोक सपकाळे (24, अकलूद) या तरुणावर महिनाभरापूर्वी चाकूहल्ला झाला होता. उपचारादरम्यान त्याची रविवारी सायंकाळी प्राणज्योत मावळली.

त्यानंतर या घटनेतील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त जमावाने सोमवारी सकाळी 10 वाजता तापी नदीजवळील टोलनाक्यावर तासभर रस्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली. 

यावेळी नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत दोषींवर कारवाई केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली. पोलिस प्रशासनाने कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वाहतूक खुली करण्यात यंत्रणेला यश आले.

उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
गत महिन्यात मंगळवार, 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास टोल नाक्याजवळून मुकेश रमेश तायडे (32, दुसखेडा, ह.मु.अकलूद) व शुभम अशोक सपकाळे (24, अकलूद) हे दुचाकीवरून जात असताना जुन्या वादातून संशयित आरोपींनी चाकूहल्ला केल्याने शुभम हा तरुण गंभीर जखमी झाला होता. 

अकलूदजवळील टोल नाक्यासमोर ही घटना घडल्यानंतर आरोपीच्या घरवजा टपरीला जमावाने पेटवून दिले होते. चाकूहल्यात जखमी झालेल्या शुभम सपकाळे या तरुणावर भुसावळातील खाजगी रुग्णालयात सुमारे एक महिन्यांपासून उपचार सुरू असतानाच रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुरूवातीला अविनाश शामलाल गुप्ता व भोला उर्फ राज रामचरण गुप्ता (दोन्ही रा.अकलूद, ता.यावल) या चुलतभावांना अटक करण्यात आली असून ते सध्या कारागृहात आहे.

संतप्त जमावाचा रस्ता रोको
चाकू हल्ल्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यासह त्यांना गावात राहू देण्यास पायबंद घालावा या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांसह जमावाने यावल महामार्ग सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास रोखून धरला. पोलिस यंत्रणेने धाव घेत जमावाची समजूत घातल्यानंतर तासाभराने वाहतूक खुली झाली.

0/Post a Comment/Comments