शहरातील जिल्हा रुग्णालय व बी. जे. मार्केटसमोरील गट क्रमांक १८३ जुना सिटी सर्वे क्रमांक २६६१ व नवीन ११८/१, ११८/२ या जागेवर पूर्वी बौद्ध वसाहत असताना, १९८३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पुतळे उभारले होते. वसाहत उठविल्यानंतरही ते पुतळे कायम होते.
गुरुवारी (ता. १६) सकाळी सहाच्या सुमारास प्रशांत शरद देशपांडे, अमित एकनाथ पाटील व इतरांनी विनाक्रमाकांचा जेसीबी आणून कंपाऊंड वॉलचे गेट तोडत आत प्रवेश केला. याबाबत माहिती मिळताच अमर सोनवणे, शांताराम सोनवे, मिलिंद शिरसाठ, सतीश गायकवाड, विजय निकम आदींच्या देखत आणि पोलिसांच्या उपस्थितीत दोन्ही पुतळे काढून नेले.
पुतळे काढल्याचे कळताच बौद्ध समाजबांधव व आंबेडकरप्रेमी जनता एकवटत असताना, प्रशांत देशपांडे व त्याच्या साथीदारांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. याप्रकरणी सुजाता ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रशांत देशपांडे व त्याच्या साथीदारांवर ॲट्रासीटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
संबंधितांवर कारवाईची मागणी
दलित झुंजार नेते राजाराम गाढे यांच्या नेतृत्वाखाली या पवित्र पुतळ्यांची स्थापना त्या काळी करण्यात आली. असे असताना, हे पुतळे हटविण्याचा घाट प्रशासनाने घातला. त्यासंबंधी आदेश देणारे प्रशासनातील अधिकारी, तसेच पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने केली आहे. तसेच हा पुतळा पुनर्स्थापित करण्यात योगदान देणाऱ्या चंद्रमणी तायडे यांचा पक्षाचे संपर्कप्रमुख राजू मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा