एक लाखाची लाच स्वीकारतांना ग्रामविकास अधिकाऱ्यास अटक

बुलढाणा: मोताळा तालुक्यातील बोराखेडी ग्रामपंचायतीमध्ये ज्या कागदपत्रांच्या आधारे विवाह नोंदणी करण्यात आली आहे ती कागदपत्रे देण्यासाठी ४ लाख हजार रुपयांच्या लाचेची व साखरेच्या एका पोत्याची मागणी करणाऱ्या बोराखेडी येथील ग्रामसेवकास लाचेचा पहिला हप्ता १ लाख रुपये स्वीकारतांना बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री आठ ते साठेआठ वाजेदरम्यान रंगेहात पकडले.

या प्रकरणात रामचंद्र गुलाबराव पवार (५४) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. बोराखेडी येथील ग्रामपंचायतीमध्ये तो कार्यरत होता. बोराखेडी येथील एकास २००८ मध्ये ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आलेली विवाहाची नोंद कोणत्या कादपत्रांच्या आधारे करण्यात आलेली आहे ती कागदपत्रे हवी होती. त्यासाठी तक्रारदार यांनी ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र अनुषंगीक माहिती देण्यासाठी पवार यांनी चार लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र लाच द्यावयाची इच्छा नसल्याने प्रकरणी संबंधितांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

दरम्यान त्यानंतर पडताळणीच्या वेळी झालेल्या तडजोडीमध्ये २ लाख १ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले होते. त्यापैकी एक हजार रुपये रामचंद्र पवार याने फोन पे द्वारे स्वीकारले होते. उर्वरित रकमेपैकी एक लाख रुपये तत्काळ घेऊन येण्यास सांगितल्याने ३१ जानेवारी रोजी सापळा कारवाई करण्यात आली. त्यात आरोपी रामचंद्र पवार यांने एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना त्यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रात्री आठ ते साठेआठ दरम्यान बुलढाण्यातील चिखली रोडवरील एका कंत्राटदाराच्या बंगल्यासमोरील आठ क्रमांकाच्या गाळ्याच्या परिसरात केली. प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत प्रकरणात बुलढाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

३१ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास करण्यात आलेली ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सचीन इंगळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्याम भांगे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विलास साखरे, पोलिस नायक मोहम्मद रिजवान, प्रवीण बैरागी, जगदिश पवार, विनोद लोखंडे, सुनील साऊत, रविंद्र दळवी, महिला पोलिस कॉन्स्टेबल स्वाती वाणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

0/Post a Comment/Comments