त्यातच जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चक्क कारवाईसाठी आणलेले ट्रॅक्टर पोलीस घेऊन गेले आणि काही वेळेनंतर पुन्हा ट्रॅक्टर घेऊन आले. सर्व प्रकारची माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी तक्रार केली असून तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि एलसीबीच्या तीन कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, तक्रारीमुळे इतरांना वचक बसला असला तरी तालुका आणि एलसीबीचे वाळू बीट सांभाळणाऱ्यांचे मात्र फावले झाले आहे.
जळगाव शहरातून रात्रभर गिरणा नदीपात्रातून उपसा केली जाणारी वाळू अवैधरित्या वाहतूक केली जात असते. महसूल आणि पोलिसांच्या आशिर्वादाने हे सर्व सुरू असल्याचे सर्वश्रुत आहे. अनेकदा तर वाळूमाफियांनी पोलिसांना लाच प्रकरणात अडकवून त्यांचा गेम केल्याचे प्रकार घडले आहेत. शनिवारी देखील असाच एक कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला. पोलीस अडकत असले तरी काही पोलीस कर्मचारी वाळूमाफियावर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देत असतात. बहुतांश ठाण्यात तर वाळू बीट पाहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे लागेबांधे आणि इतर संबंध प्रभारी अधिकाऱ्याला पूर्णपणे कळत देखील नाही.
माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्या माहितीनुसार, जळगाव शहरात वाहतुक करणारे एक ट्रॅक्टर शुक्रवारी दि.२७ जानेवारी रोजी एलसीबीच्या कर्मचार्यांनी पकडून ते कारवाईसाठी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात आणले. परंतु थोड्यावेळानंतर तेच कर्मचारी पुन्हा पोलीस ठाण्यात आले त्यांनी ते ट्रॅक्टर कारवाई करण्यासाठी एलसीबी ऑफिसला घेवून जात असल्याचे सांगून ते ट्रॅक्टर सोडून दिले. या प्रकाराची ठाणे अंमलदारांनी पोलीस ठाण्यातील स्टेशन डायरीमध्ये नोंद घेतली. परंतु पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असल्याचे लक्षात येताच दुसरे एक ट्रॅक्टर त्याठिकाणी लावण्यात आले. याप्रकरणाची माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांसह पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी या प्रकाराची तात्काळ गंभीर दखल घेतली. शनिवारी एका ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपककुमार गुप्ता यांनी एलसीबीचे कर्मचारी दीपक शिंदे, अविनाश देवरे व रवी यांची विभागीय चौकशी करण्याची तर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना तात्काळ मुख्यालयात जमा करण्याची मागणी केली आहे.
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनच वाळू चोरीला सुरुवात होते. तालुका पोलिसांच्या नाकावर टिच्चून आणि आशीर्वादाने हे सर्व सुरू असते. वाळू बीट सांभाळण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात मोठी चुरस असून काही दिवसांपूर्वी असेच बीट पाहणाऱ्या एका कर्मचाऱ्याबद्दल चुकीची माहिती बाहेर पसरवून दुसऱ्याने ते बीट मिळवले होते. वाळू वाहतुकीचे बीट सर्वच पोलीस ठाण्यात प्रभावी आहे परंतु त्यातल्या त्यात तालुका आणि एलसीबीचा त्यात मोठा प्रभाव आहे. वाळू ट्रॅक्टर पकडणे आणि सोडण्याचा काही दिवसांपूर्वी पाळधी येथे देखील खेळ झाला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांच्या तक्रारीमुळे नवखे तीन कर्मचारी चर्चेत आले असले तरी मुख्य म्होरके मात्र अद्यापही बिनधास्तच आहेत. गोद्री कुंभ पार पडल्यावर वाळूमाफिया आणि पोलिसांमधील हितचिंतकबाबत पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
टिप्पणी पोस्ट करा