भडगाव: कोळगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

भडगाव: कोळगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न. 
 
महाराष्ट्र शासन कृषी विभाग भडगाव व जि.प.प्राथमिक शाळा कोळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कोळगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. यामध्ये सकाळी संपूर्ण गावातून शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रभात फेरी काढून पौष्टिक तृणधान्य विषयी जनजागृती केली.

 सदर कार्यक्रमा वेळी शाळेत पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त सुबक रांगोळी काढून तृणधान्य पौष्टीकतेबाबत संदेश देण्यात आले तसेच पौष्टिक तृणधान्याची विद्यार्थ्यांना व उपस्थितांना ओळख व परिचय होण्यासाठी शाळेत प्रदर्शन ठेवण्यात आलेले होते.

 तसेच पौष्टिक तृणधान्यांमध्ये बाजरी, ज्वारी, राजगिरा, राळा, वरई व नाचणी या पिकांचे आरोग्यविषयक गुणधर्म सांगणारे विविध माहीतीपर चार्ट फोटोसह प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेले होते. प्रभात फेरी व प्रदर्शनानंतर शाळेत झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सौ.कविता अंकुश सोनावणे ह्या होत्या तर मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी श्री.भगवान गोर्डे उपस्थित होते.
 आपल्या मार्गदर्शनपर भाषणात तालुका कृषी अधिकारी यांनी पौष्टिक तृणधान्याचा पूर्व इतिहास सांगताना केंद्र शासनाने १३ एप्रिल २०१८ रोजी राजपत्राद्वारे अधिसूचना काढून ज्वारी बाजरी नाचणी नागली वरई इत्यादी लघु तृणधान्य पिकांना यापुढे पौष्टिक तृणधान्य पिके म्हणून संबोधले जाईल असा निर्णय घेण्यात आला तसेच नीती आयोगाने याद्वारे अन्नसुरक्षा बरोबरच आहार सुरक्षेस प्राधान्य दिल्याचे नमूद केले.तसेच पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करताना पौष्टिक तृणधान्यांचे उत्पादन वाढविणे त्याचबरोबर त्यांचे आरोग्यविषयक फायदे बाबत जनतेत जनजागृती निर्माण करणे व पौष्टिक तृणधान्यांचे लोकांच्या आहारातील प्रमाण वाढविणे या उद्देशाने संपूर्ण वर्षभर मिलेट ऑफ द मंथ या संकल्पनेवर विविध कार्यक्रम साजरे केले जाणार
 असले बाबत प्रतिपादन केले सदर वेळी बोलताना कृषी अधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाने ६ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करून दरवर्षी संक्रांत भोगी हा दिवस पौष्टिक तृणधान्य दिवस दिन म्हणून साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला बाबत माहिती दिली तसेच पुढे बोलताना त्यांनी तृणधान्य विशेष महिना बाबत जानेवारी महिना बाजरीसाठी, फेब्रुवारी महिना ज्वारीसाठी, श्रावणातील उपवास असल्याने ऑगस्ट महिना राजगिऱ्यासाठी, सप्टेंबर महिन्यात पितृपंधरवडा असल्याने राळ्यासाठी, ऑक्टोबर महिन्यात नवरात्र उत्सव असल्याने वरई साठी व डिसेंबर महिना नाचणीसाठी समर्पित केला असले बाबत सांगितले त्याचबरोबर ज्वारी व बाजरी पिकाचे महत्त्व सांगताना बाजरी पिकामध्ये लोहाचे प्रमाण ८१ पीपीएम व जस्ताचे प्रमाण ४२ पीपीएम असून ८० टक्के महिलांमध्ये लोहाची कमतरता असून ५ वर्षापेक्षा कमी वयाची ५२ टक्के मुले ॲनेमिया आजाराने ग्रस्त असून सदर आजारावर मात करण्यासाठी दररोजच्या आहारात बाजरीचा समावेश करणे अत्यंत आवश्यक असले बाबत मत व्यक्त केले त्याचबरोबर पौष्टिक तृणधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीनचा व तंतूमय पदार्थांचा साठा असल्याने ज्वारी बाजरी सह इतर पौष्टिक तृणधान्य खाण्यामध्ये समावेश करून आपण बद्धकोष्ठता, स्थूलता,मधुमेह, बीपी या सारख्या आजारांवर नियंत्रण मिळू शकतो याबाबत माहिती दिली तसेच विविध पौष्टिक तृणधान्यांची आरोग्य विषयक गुणधर्म सांगताना राजगिऱ्यामध्ये लायसीन या अमिनो अँसिडचे प्रमाण जास्त असल्याने केसांच्या आरोग्यासाठी राजगिरा उत्तम असल्याचे सांगितले त्याबरोबर नाचणी मध्ये ३४४ मिलीग्राम प्रति १०० ग्रॅम सर्वाधिक कॅल्शियमचे प्रमाण असून हाडे मजबूतीसाठी व वाढीसाठी मुलांनी आहारात जास्तीत जास्त नागली च्या पदार्थांचा वापर करणे बाबत माहिती दिली त्याचबरोबर सर्व पौष्टिक तृणधान्यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेह झालेल्यांना मधुमेहावर नियंत्रणासाठी ज्वारी आणि बाजरी खाणे आरोग्यास चांगले असले बाबत सांगितले अशाप्रकारे विस्तृत स्वरूपात पौष्टीक तृणधान्याचे महत्व व संकल्पना उपस्थितांना कृषी अधिकाऱ्यांनी पटवून दिली. सदर वेळी पंचायत समिती कृषी अधिकारी ईश्वर देशमुख, मंडळ कृषी अधिकारी भडगाव श्री.उत्तम जाधव, कृषी सहाय्यक सुखदेव गिरी यांनी मनोगत व्यक्त केले. सदर वेळी उपस्थित सर्वांना पौष्टिक तृणधान्यांचा आठवड्यातून किमान दोन दिवस आहारात समावेश करणे बाबत सामूहिक शपथ देण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना व शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून सुरुवात या उक्तीप्रमाणे पौष्टिक तृणधान्य बाजरी खिचडीचा अल्पोपहार देण्यात आला. 
सदर कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोक्रा समुह सहाय्यक श्रीकांत राजपूत यांनी केले. जि.प.शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानासाहेब सोनवणे, पथराडचे सरपंच रविंद्र पाटील, पिंप्रीहाटचे सरपंच दिपक मोरे, उपसरपंच रुपचंद, मंडळ कृषी अधिकारी कजगाव अनिल तायडे, उप शिक्षक शांताराम महाजन, शिक्षिका मनीषा पाटील, श्रीमती जाधव इ सह मोठ्या संख्येने महिला व शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रमात शेतकऱ्यांना बाजरीचे महत्त्व समजावे म्हणून बाजरीचे धनशक्ती या वाणाचे मिनि किटचे वितरण ही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक रणजित राजपूत, सचिन पाटील, सुभाष राठोड, राजेश राठोड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल सोनवणे, जितेंद्र गोसावी, शिवशंकर पाटील, पांडुरंग महाजन यांनी परिश्रम घेतले. 


 प्रतिनिधी , सतीश पाटील. (गोंडगाव ता.भडगाव)

0/Post a Comment/Comments