शिरसाळा येथून दर्शन करून परत येत असतांना झालेल्या अपघातात बुऱ्हाणपूर येथील दुचाकी स्वार दोघे तरुण जखमी, अपघातात एक किरकोळ तर दुसऱ्या तरुणाचा पाय तुटून गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारार्थ बुऱ्हाणपूर येथे हलविण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की, शनिवार दि. 21 जानेवारी 2023 रोजी पहाटे 4 वाजता शिरसाळा ता. बोदवड येथून श्री. मारुतीरायाचे दर्शन घेवून बऱ्हाणपूर कडे परत येत असताना सारोळा - माळेगाव दरम्यान वळण रस्त्यावर एका अज्ञात बोलेरो चारचाकी वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघातात मनोज प्रमोद ठाकुर (वय-20), मोहित गणेश महाजन (वय- 19 ) घे. ती बुऱ्हाणपूर जखमी झालेले असून मनोज ठाकुर यांचा पाय तुटून तो गंभीर जखमी झालेला असून याप्रकरणी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर पोलिस स्टेशन पो.कॉ.गणेश मनुरे, पो.कॉ.धर्मेंद्र ठाकूर यांनी तसेच मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका घेवून आरोग्य सेवक प्रदीप काळे, चालक रवी जंगले यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले तर मनोज ठाकूर यांचा तुटलेला पाय पिशवीत टाकून आणावा लागला अशी माहिती प्रदीप काळे यांनी दिली. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात डॉ शोएब खान, डॉ प्रशांत रामवंशी, आरोग्य सेवक प्रदीप काळे, परिसेविका कल्पना नगरे, सुनीता कसबे आदींनी उपचार केले. तसेच जखमींना पुढील उपचारार्थं जखमींच्या नातेवाईकांच्या सहमतीने बुऱ्हाणपूर येथे हलविण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा